
रासायनिक खताचा एक दाणाही नाही, कापसाचे एकरी 20 क्विंटल उत्पादन काढलं!
रासायनिक #खते #कापूस #उत्पादन #काढणी #शेतकरी #शेती #जळगाव #सेंद्रिय
प्रमोद पाटील कापूस म्हणजे शेतकऱ्यांसाठी जणू पांढरं सोनंच… या सोन्याला पिकवायचं अन् बाजारात विकायचं म्हटलं की पदरी पडणारा भाव शेतक-यांच्या मेहनतीची मस्करी करणारा ठरतो. हमीभावापेक्षा(cotton MSP) कमी भाव मिळत असल्यानं या पिकाचा पेरा दिवसेंदिवस कमी होत आहे. परंतु उत्राणच्या अतुल सुरेश महाजन या पट्ठ्यान हार मानली नाही. एकरी २० क्विंटल कापसाचे(Kapus Utpadan) उत्पन्न काढत त्यानं मार्चच्या कडक उन्हात कापूसाचा गारवा अनुभवला आहे.
जळगाव जिल्ह्यातील (Jalgoan District) एरंडोल तालुक्यातील अतुल महाजन यांनी ३ जून २०२४ रोजी कापसाच्या वाणाची लागवड केली होती. रासायनिक खतांचा एक दाणा देखील शेतात खत म्हणून दिला नाही, फक्त सेंद्रिय खते, एक ट्रॉली शेणखत, ४ फवारणी, ड्रिंचिगमध्ये पोषक घटकांचा वापर केला. मजुरीसह सुमारे ३५ हजार रुपये एकरी खर्चातून त्यांनी हे उत्पन्न काढले आहे.
महाजन यांचा आतापर्यंत १२ क्विंटल कापूस वेचला गेला असून फरदडच्या कापसाची वेचणी हल्ली सुरू आहे. आणखी आठ क्विंटलचा कापूस हाती येईल, असा त्यांचा अंदाज आहे. परिसरातील मुख्य पीक कापूस हेच असूनही गेल्या अनेक वर्षांपासून त्याला योग्य भाव नाही. कापसाला ६००० ते ६५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो. नांगरणी, वखरणी, पेरणी, निंदणी, फवारणी, कोळपणी, मजुरी या भयंकर खर्चाच्या मानाने कापूस परवडत नसल्याने दिवसेंदिवस या पिकाचा पेरा घटत चालला आहे.
मागील हंगामात अडीच एकर कापूस लागवड केली होती. त्यात एकरी १२:५ क्विंटल कापूस आला. फरदड १२ ते १३ क्विंटल येईल. कोणतेही रासायनिक घटक न वापरता साडेबारा क्विंटल एकरी कापूस आला. हा प्रयोग आपण गेल्या तीन वर्षांपासून सतत करीत आहोत. शेतकऱ्यांनी अल्प खर्चाची शेती करावी, सेंद्रिय खतांचा वापर करावा.- अतुल सुरेश महाजन, शेतकरी, एरंडोल.